श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती

प्राचीन काळापासून मानव शक्तीची उपासना करीत आला आहे. मानवी जीवनात शक्ती उपासनेला विशेष महत्व आहे. श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर असून उपासकांना त्यामुळे त्याचा लाभ झालेला आहे. या शक्तीपिठापैकीच “श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती” या तिन्ही स्थानाचे त्रिगुणात्मक साक्षात ब्रम्हस्वरूपीणी ओंकार स्वरूपात अधिष्ठित आहे आणि तेच म्हणजे कोटमगाव येथील श्री जगदंबा माता होय.

कोटमगाव ता. येवला येथील देवीची एक आख्यायिका आहे. ती अशी, महासती वृंदा हिचा पती दैत्यराज जालींधर हा सती वृंदाच्या प्रभावाने त्रिलोकी विजयी झाला. त्याला अपयश माहित नव्हते. सती वृंदाच्या तपसामर्थ्याने अपयश न आल्याने त्याने सामांध होऊन देवलोकावर स्वारी केली. त्यामुळे सर्व देवांनी श्री विष्णूचा धावा केला. श्री विष्णूंनी जालींधराच्या यशाचे सामर्थ्य सती वृंदेचे सतीत्व असल्याचे ओळखले व सर्व देवांच्या रक्षणासाठी श्री भगवान विष्णूंनी जालींधराचे रूप धारण केले व सतीचे शील हरण केले. शिलहरण झाल्याबरोबर दैत्यराज जालींधर पराभूत झाला व त्याचा मृत्यू झाला. जालींधराचा मृत्यू झाल्या बरोबर सतीने श्री विष्णूंना ओळखले व तुम्ही शालीग्राम होऊन पडाल असा शाप दिला शापाने श्री विष्णू शालीग्राम होऊन कोटमगावी पडले.श्री विष्णूंचा शोध करीत देवी श्री महलक्ष्मी, श्री महासरस्वती यांच्याकडे गेल्या तेथे श्री विष्णू नसल्याने दोघी परत श्री महाकालीकडे गेल्या तेथेही श्री विष्णू नसल्याने तिघीही शोधावयास निघाल्या आणि शोधता शोधता तिघींना श्री विष्णू कोटमगावी शालीग्राम रुपात दिसले. त्यांनी सती वृंदेचा उद्धार करून श्री विष्णूंना शाप मुक्त केले आणि तिघींनी ह्या स्थळी म्हणजे कोटमगाव येथे रज तम आणि साम अशा त्रिगुणात्मक रुपात वास करू लागल्या व मग या त्रिगुणात्मक गुप्तरूप एका नांगरणाऱ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून अवतीर्ण झाल्या, असे हे जगदंबा मातेचे स्थान.

श्री क्षेत्र जगदंबा देवस्थान कोटमगाव हे सेनापती तात्या टोपेंची जन्मभूमी असलेल्या येवले शहरापासून केवळ हाकेच्या अंतरावर असलेले भाविकांचे श्रद्धास्थान. हे देवस्थान अतिशय जागृत व जाज्वल म्हणून परिचित आहे. येथे मातेची अति प्रस न्ना तेजस्वी स्वयंभू तीन फुट उंचीची शेंदरी मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. श्री महाकाली,श्री महलक्ष्मी, व श्री महासरस्वती हे तीनही रूप एकाच ठिकाणी पहावयास मिळत असल्याने येथे विशेष महत्व आहे. सप्तश्रुंग, माहूर, व तुळजापूर या तीन क्षेत्रांचे उगमस्थान कोटमगावची जगदंबा माता आहे तर काहींच्या मते ही महाकाली, महलक्ष्मी व महासरस्वती या तिघींचे एकरूप आहे. जगदंबेच्या स्थापनेचा काळ निश्चित नसला तरी येवला शहर वसण्याच्या शेकडो वर्ष अगोदरचे हे जागृत देवस्थान आहे. नारंदी नदीतिरी वसलेले अतिशय निसर्गरम्य असे पवित्र स्थान नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद या जिल्ह्यांच्या सीमारेषे नजीकचे देवस्थान असल्याने येथे भक्तांची नेहमीच वर्दळ दिसून येते. मातेचे अतिशय प्रशस्त असे मंदिर असून मंदिराचा कळस लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतो. मंदिराचे समोरच भव्य हॉल असून नेत्रदीपक अशी दीपमाळ उभी आहे. तसेच बाहेरील बाजूस असलेले दोन भव्य महाद्वार देवस्थानच्या वैभवात भर घालतात.

यात्रा काळात मातेला नवनवीन प्रकारच्या पैठण्यासाड्या परिधान केल्या जाऊन सोन्या चांदीचे अलंकार चढविले जातात. पुष्पमालांची सजावट केली जाते. मातेचा नैवद्य चांदीच्या ताटात व चंदनाच्या पाटावर अशा शाही थाटात दाखविला जातो. मातेचे तेजस्वी व मोहक रूप पाहून भक्तगण भारावून जातात. “उदे ग अंबे उदे आई उदे ग अंबे उदे” चा जयजयकार होतो. महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण भारतातून भक्तांचा महासागर या ठिकाणी पहावयास मिळतो. नवसाला पावणारी माता अशी या देवस्थानची ख्याती असल्याने घटी बसण्याची अतिशय जुनी व तुलनेने सर्वाधिक अशी परंपरा देसून येते. स्वत:ला उलटे टांगून नवस फेडण्याची आगळीवेगळी परंपरागत पद्धत या ठिकाणी पहावयास मिळते.यात्राकाळात मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात येऊन मंदिराची शोभा वाढविली जाते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांबरोबरच अनेक स्वयंसेवक जातीने लक्ष ठेवून असतात. सकाळ व सायंकाळ महाआरती करण्यात येऊन दररोज विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येवल्याच्या आणि तालुका परिसराच्या धार्मिकतेला या दिवसात उधान येते. येथील यात्रा अतिशय वैशिष्ट्या पूर्ण असून येथे विविध प्रकारच्या खेळण्यांच्या दुकानाबरोबरच मिठाईची दुकाने तसेच प्रसादाची दुकाने दिसतात. पाळणे व अन्य दुकाने यात्रेच्या आकर्षणात भर घालतात. घटी बसणाऱ्या भाविकांसाठी मोफत ने-आण करण्याची विविध संस्थानकडून व्यवस्था केली जाते. येवला-कोटमगाव हा ३ कि.मी. रस्ता यात्रा काळात भाविकांनी दुतर्फा भरून वाहत असतो. यात्रा काळात हजारो भाविक नऊ दिवस श्रद्धेनुसार शंकरपाळे, खारका यांची देवीसमोर उधळण करतात. हा प्रसाद म्हणून झेलणाऱ्याचीही याप्रसंगी झुंबड उडते.

विकालांगांना आधार देणारी, दुर्बलांना सबळ करणारी अन निशस्रकाला शक्ती देणारी हि माता असल्याने सर्वजन मातेच्या दर्शना करिता आतुर झालेले असतात. हे देवस्थान जगदंबा मातेचे स्वयंभू अधिष्ठाण असल्याने लाखो भाविक मातेपुढे नतमस्तक होतात. माता संपूर्ण विश्वाची जननी असल्याने आबाल वृद्धांपासून तसेच गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वधर्मीय मनोभावे प्रार्थना करतात व आशीर्वाद घेतात.